मी मुंबईकर आणि समुद्रकिनारा
- Pratiksha Poshture
- Aug 4, 2020
- 3 min read

आपल्या भारत देशाचा 75% भाग समुद्राने वेढलेला आहे. महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीचा किनारा लाभला आहे. मुंबई , पालघर, अलिबाग, रत्नागिरी , कोकण अशा कितीतरी ठिकाणी खूप सुंदर असे समुद्र किनारे लाभले आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना आताच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून शांत आणि सुंदर समुद्रकिनारी फिरायला नक्कीच आवडत.
आपल्या मुंबईकरांना समुद्रकिनारी गेला आहात का? हा प्रश्न विचारण हे चुकीचे ठरेल. कारण आपल्याला तर समुद्रकिनारी जाण्यासाठी कोणत्याही कारणांची गरज नसते. मनात आलं गाडीला चावी लावली की तासंतास किनारी जावून बसायचं.... हा म्हणजे समुद्रकिनारा जवळ असेल तरच हा. समुद्र किनारा जरी लांब असेल तरी आपण महिन्यातून एकदा- दोनदा, मित्रांसोबत किंवा कुटूंबासोबत जातोच.
काहींचा तर समुद्रकिनारी जावून बसणे हा एक छंदच असतो. " मन अशांत झालं", म्हणजे मनात खूप साऱ्या विचारांनी गर्दी केली ना की त्या शांत अशा किनारी जाऊन बसायचं. समुद्राच्या त्या लयबद्ध लाटा, एकामागून एक येणाऱ्या लाटांमध्ये तयार होणारे ते संगीत आणि त्या लाटांना साथ देत मंद मंद वाहणारा गार-गार वारा, एक वेगळीच धून तयार करत असतात. थेट क्षितिजापर्यंत पसरलेला आकाशी निळ्या रंगाचा अथांग समुद्र, समुद्रात दूरवर तरंगणाऱ्या दोन-तीन बोटी, दूरपर्यंत पसरलेला वाळूचा स्वच्छ समुद्रकिनारा, त्यात पांढराशुभ्र फेस घेऊन पायावर येणाऱ्या आकाशी निळ्या लाटा. समुद्राच्या पाण्यात उभं राहिल्यावर लाटांबरोबर वाळू सरकताना पायांना होणाऱ्या त्या गुदगुल्या आयुष्यात एकदातरी प्रत्येकाने अनुभवले असणारच!!!
किनाऱ्यावर येणारी प्रत्येक लाट ही तिच्यासोबत येताना समुद्रातला बराचसा खजिना घेऊन येते आणि परत जाताना आपण कुठपर्यंत पोहोचलो होते हे दाखवण्यासाठी सुबक नक्षी त्या शुभ्र वाळूत काढत असते तर तिच्याच पाठून येणारी दुसरी लाट ते सगळं पुसून, गेलेल्या लाटेला काहीच अस्तित्व नाही हे सिद्ध करत असते. समुद्र आपल्याला एक धडा शिकवतो जणू. आयुष्यात पूर्वी काही घडलय त्याच्यासोबत न जगता, प्रत्येक दिवस नवीन उमेदीने जगा.
लाटेबरोबर आलेले ते छोटे छोटे शंख शिंपले किनाऱ्यावरच्या वाळूत अस्ताव्यस्त पडलेले असतात. समुद्रकिनारा हे असे ठिकाण जेथे समुद्र व आकाश एकरूप होऊन एक निसर्गरम्य देखावा तयार करत असतो. सूर्योदयाच्या वेळी दूरवर असणाऱ्या मंदिरातून ऐकू येणारे घंटानाद, घोळक्याने किलकीलाट करत अन्नाच्या शोधात उडणारे पक्षी, सकाळी मॉर्निंग वॉक ला आलेले जवळपास राहणारे रहिवासी, मासेमारीसाठी तयार झालेल्या बोटी. त्यातच कॉलेज बुडवून आलेले तरुण युवक, काही वाळूत चटई टाकून मस्त अंताक्षरी आणि इतर बैठी खेळ खेळत असतात. तर काही वाळूत आपले नाव लिहून येणाऱ्या लाटेबरोबर पुसून गेल्यावर पुन्हा त्याच आनंदाने लिहत असतात. तर काही किनाऱ्यावर वाळूत बसून पुढच्या आयुष्याचे स्वप्न रंगवत असतात. आणि जसा तो सूर्य डोक्यावर येतो तसे हळूहळू सगळेच समुद्राला लाटांसोबत एकटे ठेवून निघून जातात. दुपारच्या रणरणत्या उन्हात एकाकी असलेला किनाऱ्यावर संध्याकाळी लोकांची वर्दळ वाढू लागते. हाच समुद्रकिनारा संध्याकाळी मात्र पूर्ण वेगळा भासतो.
सूर्यास्तच्या वेळी या किनाऱ्याचे सौंदर्य तर अजूनच खुलून येते. अस्ताच्यावेळी पश्चिमेला पसरलेली सोनेरी तांबूस लाली, हळूहळू अस्ताला जाणार तो सोनेरी केशरी रंगाचा गोळा. अस्ताला जाणारा सूर्य समुद्राच पाणी व निळाशार आकाश दोघांना आपला रंग देतो. समुद्राच पाणी जणू लाव्हारस सारखं आणि आकशने जणू सोनेरी रंगाची चादर ओढली आहे असं भासत. काही ग्रुप किनाऱ्यावर फोटो काढत असतात, तर काही लहान मुले वाळूचे किल्ले करण्यात दंग असतात. तर काही किनाऱ्यावर जमा झालेले शंख शिंपले आणि सागरगोटे गोळा करण्यात व्यस्त असतात. प्रेमी युवकांना तर रोमँटिक असे वातावरण निर्माण होते, ते तर आपल्याच विश्वात गुंग असतात. जवळपास राहणारे आजी आजोबा इव्हनिंग वॉकला आलेले असतात. तर मध्यम वयीन मुले आपले आवडते खेळ खेळत असतात. घोडा गाडी , उंटाची सवारी.....आणि त्याही पलीकडे समुद्रकिनारी जाऊन गोळा किंवा भेळ खाल्ली नाही तर पापच !!!! हा पण एवढ्या आवाजात ही त्या लयबद्ध वाहणाऱ्या लाटा आपला संगीत काही सोडत नाहीत.
अस्ताला जाणारा तो सूर्य अर्धा समुद्राच्या पोटात गेला की परतीच्या प्रवासाला निघालेले पक्षी, घराच्या दिशेने वाटचाल करणारे नौकाविहार...... खेळून खेळून दमलेल्या वाळूत अस्ताविस्त झालेल्या लहान मुलांना "पुन्हा येऊ" अस बोलून बळेच घरी घेऊन जाणारे आई वडील. एकमेकांचा निरोप घेणारे प्रेमी युवक, एक शेवटचा फोटो म्हणून कल्ला करणारे ग्रुप सगळे निघून जातात आणि हळूहळू करून तो गजबजलेला किनारा शांत होतो.
शेवटी त्या सागराला निरोप घेत सूर्य अस्ताला जातो आणि मग समुद्राला साथ होते ती चंद्राची आणि त्या शीतल चांदण्यांची. सगळीकडे असणाऱ्या निरव शांततेमुळे त्या लयबद्ध लाटांचा भरदस्तपणा जाणवायला लागतो. सोनेरी किरणांची जी जागा शीतल चांदण्यांनी घेतली होती ती आता काळाकुट्ट अंधार घेतो आणि अशातच पाहत होते, चंद्र आपल आवरून मावळतीला झुकतो आणि पाठीमागे असलेल्या झाडीतून सूर्य प्रकाशाचे जाळे फेकायला सुरुवात करतो आणि पुन्हा एकदा एक नवी उमेद घेऊन तो किनारा आपले खुललेले सौंदर्य दाखवायला सज्ज होतो.
Comments